मंगळवारपासून बोर्डाची पुरवणी परीक्षा.प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी

फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर दि १४ जून २०२६):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांत ही परीक्षाही अत्यंत कडक शिस्तीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.

परीक्षेचे वेळापत्रक:
इयत्ता १० वीची लेखी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे, तर इयत्ता १२ वीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात एकूण ५९ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, १० वीसाठी ३४ आणि १२ वीसाठी २५ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
१० जून २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, या पुरवणी परीक्षेसाठी ११,२७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या:

सातारा:इयत्ता १० वीचे ९१२ आणि १२ वीचे २,११६ असे एकूण ३,०२८ परीक्षार्थी १५ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

सांगली: इयत्ता १० वीचे १,२४३ आणि १२ वीचे ३,०८३ असे एकूण ४,३२६ परीक्षार्थी २० केंद्रांवर परीक्षेला बसतील.

कोल्हापूर:इयत्ता १० वीचे १,०७१ आणि १२ वीचे २,८५४ असे एकूण ३,९२५ परीक्षार्थी २४ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

कॉपीमुक्त’ अभियानासाठी कडक पावले –
परीक्षेतील पावित्र्य राखण्यासाठी मंडळाने ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:
सीसीटीव्हीची सक्ती: मागील परीक्षेप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असून, त्याचे फूटेज सुरक्षित (SAVE) ठेवण्याच्या सक्त सूचना शाळा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

दक्षता समितीचा ‘वॉच’: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीमध्ये पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांचा समावेश करून या समितीला व्यापक अधिकार देण्यात आले आहेत.भरारी पथके स्थापन येणार आहेत.

संवेदनशील केंद्रांवर विशेष नजर:विभागीय मंडळ आणि जिल्हा प्रशासनाकडून उपद्रवी व संवेदनशील केंद्रांची यादी निश्चित करण्यात आली असून, तेथे विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. गैरप्रकार आढळल्यास केंद्रचालक व संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक उपक्रम:
परीक्षा तणावमुक्त आणि नियोजनबद्ध व्हावी, यासाठी मंडळाने “बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे” ही विशेष पुस्तिका तयार केली आहे. याशिवाय, उत्तरपत्रिकांचे अचूक लेखन कसे करावे, या विषयावरील मार्गदर्शक व्हिडीओ युट्युब आणि मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा देतानाच, गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी मंडळाची संपूर्ण यंत्रणा सतर्क असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्याने कोणताही गैरमार्ग न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!