मुधोजी हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात; दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शाळा

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ०५ सप्टेंबर २०२६ ):- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननवरे आणि पर्यवेक्षिका पूजा पाटील यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यानिमित्ताने प्रशालेत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी-शिक्षक’ बनून इयत्ता आठवी आणि नववीच्या वर्गांवर १ ते ४ तासिकांचे ज्ञानदान केले. विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, मराठी, हिंदी, संस्कृत, कला, क्रीडा आणि समाजशास्त्र यांसारख्या विविध विषयांचे अध्यापन करून एक वेगळा अनुभव घेतला.

Screenshot


समारोपाच्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी हा अनुभव अविस्मरणीय असून आयुष्यात कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे यांनी या नव्या उपक्रमाचे कौतुक करत, २०२६-२७ ची ही बॅच या उपक्रमाची मार्गदर्शक (पायोनियर) ठरल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी आणि विद्या मदने यांनी केले. शिक्षकांच्या वतीने एस. पी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले, तर वरिष्ठ शिक्षक श्यामराव आटपाडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!