जपान आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या गुणवंत खेळाडूंची भव्य गौरव रॅली

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.५ ऑक्टोबर ३०२६):-
नागोया, जपान येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी ऐतिहासिक व अभूतपूर्व यश संपादन करून साताऱ्याच्या क्रीडा विश्वात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत साहील जाधव याने आर्चरीतील कंपाऊंड क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदके, ऋतुजा पिसाळ हिने हॉकी खेळात सुवर्ण पदक आणि सुदेष्णा शिवणकर हिने ४×१०० मीटर रिले या मैदानी प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्व गुणवंत खेळाडूंचा, त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांचा तसेच पालकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने भव्य गौरव रॅली व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


या गौरव समारंभात जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील आणि शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्यासह हजारोच्या संख्येने नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

खेळाडूंची ही गौरव रॅली गांधी मैदान, राजवाडा ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या मार्गावर अत्यंत उत्साहात काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांना सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे. तसेच खेळाडू व मार्गदर्शकांनी अशी यशाची संधी जिल्ह्याला वारंवार उपलब्ध करून द्यावी.


पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. सर्व काही करू शकते, परंतु ती खेळातील पदक मिळवून देऊ शकत नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जपून त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!