मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजीमध्ये ‘रंगभरण स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; १००० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ५ ऑक्टोबर २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे सलग चौथ्या वर्षी ‘रंगभरण स्पर्धा २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडली. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, मुधोजी हायस्कूल कायमसेवकांची पतसंस्था मर्यादित फलटण आणि आदित्य असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत तब्बल १००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ वी ते ६ वी (अ-गट) आणि ७ वी ते ८ वी (ब-गट) अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, फलटण दूध संघाचे माजी चेअरमन धनंजय पवार, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, नियामक मंडळ सदस्य भोजराज निंबाळकर, माजी तालुका अध्यक्ष जयकुमार इंगळे, खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन भास्कर घोलप, माजी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन आण्णा जाधव, नवनाथ भोसले, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, मुधोजीचे प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक विजय पाटील व सौ. पूजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, शालेय वयात विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा व सुप्त गुणांना वाव देणे अत्यंत गरजेचे असते. वाढदिवसानिमित्त अशा उपक्रमांचे आयोजन करून हजारो विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश अभिमानास्पद असून, सर्व यशस्वी खेळाडू व कलाकारांनी भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फलटणचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक व अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, संस्थेच्या मार्गदर्शनामुळेच मुधोजी हायस्कूलचे विद्यार्थी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय सदैव कटिबद्ध असून, या रंगभरण स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले आहे.

याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंचा, संघांचा व मार्गदर्शक प्रशिक्षकांचा सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यामध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांखालील नेहरू चषक हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींच्या संघाचा व क्रीडा प्रशिक्षक सचिन धुमाळ, तालुका क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झालेल्या १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचा व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक शिवलिंग सावंत, सुजित जमदाडे, संजय गोफणे,वरील संघास मुख्य प्रशिक्षक अशोक गाडगीळ,सहायक प्रशिक्षक अविनाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रीको-रोमन जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या समर्थ मदने आणि जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या राजवीर भोसले व क्रीडा प्रशिक्षक तुषार मोहिते यांचा विशेष सत्कार करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या संपूर्ण स्पर्धेचे नेटके नियोजन व यशस्वी संयोजन मुधोजी हायस्कूलच्या कला विभागातील कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी, सतीश नाळे व सांस्कृतिक विभागाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती शिंदे, संजय गोफणे व सुजित जमदाडे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक विजय पाटील यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!