मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मुलींना मोफत एस.टी. पास फलटण आगारातर्फे वितरित….
फलटण एस टी आगाराच्या अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध व वेळेत मोफत पास वितरित केल्याबद्दल प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि १८ ऑगस्ट २०२६):-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना देण्यात येणारे मोफत बस पास फलटण आगाराच्या वतीने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना शाळेतच वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दिलासादायक झाला आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेमुळे विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी होणारा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठीही या योजनेचा मोठा फायदा होत आहे. मोफत बस पास वेळेत उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनींची आर्थिक बचत होण्याबरोबरच त्यांचा वेळही वाचत आहे. तसेच नियमित बससेवेचा लाभ मिळाल्यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होत आहे.

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना मोफत पास शाळेच्या ठिकाणीच उपलब्ध करून देण्यासाठी फलटण आगारातील वाहतूक नियंत्रक श्री. गोपी जाधव व श्री. प्रवीण अहिवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.विद्यार्थिनींच्या सोयीचा विचार करून पास वितरणाची प्रक्रिया वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे आणि उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने यांच्या हस्ते श्री. गोपी जाधव व श्री. प्रवीण अहिवळे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे यांनी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी फलटण आगाराने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले व विद्यार्थिनींना वेळेत मोफत बस पास उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले व इथून पुढील काळात ही असेच सहकार्य मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ विद्यार्थिनींपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, त्यासाठी शाळा आणि संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या माध्यमातूनच पास वितरणाची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनी व पालकांना आगारात जाण्याची अतिरिक्त धावपळ टळली.
या कार्यक्रमास परिवहन समितीचे उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर बोंद्रे, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष श्री चेतन बोबडे ,श्री भोईटे ,सदस्य श्री. सुधाकर वाकुडकर, श्री राजेंद्र गोडसे,श्री. श्रीकांत तावरे, श्री. सागर बोराटे, श्री. रणजीत नार्वेकर तसेच प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.


