फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ सप्टेंबर २०२६): – आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. ऑनलाइन व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच सायबर गुन्हेगारांचे जाळेही पसरत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असून, फलटण शहर पोलिसांच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

बँक, पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था कधीही दूरध्वनीवरून OTP, पासवर्ड किंवा PIN मागत नाही, त्यामुळे आपला OTP कोणाशीही शेअर करू नये. पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करावा लागत नाही आणि UPI PIN चा वापर फक्त पैसे दुसऱ्याला पाठवतानाच केला जातो. KYC अपडेट, वीज बिल बाकी, पार्सल अडकले किंवा बँक खाते बंद होण्याच्या धमक्या देणाऱ्या अनोळखी लिंक्सवर अजिबात क्लिक करू नका. पोलीस, CBI किंवा ED चे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न केल्यास पैसे देऊ नका, कारण पोलीस कधीही अशा प्रकारे ऑनलाईन ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैशांची मागणी करत नाहीत. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे टाळावे तसेच आपले फोटो, मोबाईल नंबर, पत्ता व वैयक्तिक कागदपत्रे ऑनलाईन अनोळखी व्यक्तींना पाठवू नयेत.


ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या बँक खात्याची व ATM ची माहिती गुप्त ठेवावी आणि संशयास्पद फोन आल्यास तात्काळ घरातील व्यक्तींशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चॅट करताना स्वतःची किंवा शाळेची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास अजिबात वेळ न दवडता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर बंद करण्याची गरज नाही, तर त्याचा वापर करताना जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे. ‘थांबा — विचार करा — मगच क्लिक करा’, असा संदेश पोलिस विभागाकडून दिला गेला आहे.


