सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी २५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज; १ नोव्हेंबरला मतदान तर ३ नोव्हेंबरला निकाल

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि २४ सप्टेंबर २०२६):-
सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Screenshot


दाखल झालेल्या अर्जांची प्रसिद्धी १ ऑक्टोबर रोजी केली जाणार असून, उमेदवारी अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर रोजी पार पडेल. त्यानंतर छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजीच रिंगणात उरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडणार असून मंगळवारी, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल.


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्ह्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. २१ संचालक पदांसाठी होणाऱ्या या हायव्होल्टेज निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजकीय व सहकार क्षेत्रातील आघाड्या आणि समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!