नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याचा डंका; सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळ, साहिल जाधव व सुदेष्णा शिवणकर यांचा भव्य सत्कार व रॅलीचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि ३ ऑक्टोबर २०२६):-
जपानमधील नागोया येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. या यशाबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे), जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने या सर्व विजेत्या खेळाडूंच्या सन्मानार्थ भव्य रॅली व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.


साताऱ्याच्या सुपुत्रांची सुवर्णकामगिरी:
नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याची कन्या ऋतुजा दादासो पिसाळ हिने भारतीय महिला हॉकी संघातून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. धनुर्विद्या (आर्चरी) खेळातील कम्पाऊंड प्रकारात साहिल राजेश जाधव याने वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर सांघिक (Team) आणि मिश्र सांघिक (Mixed Team) अशा दोन्ही प्रकारांत भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. याशिवाय मैदानी खेळातील सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने भारतीय ४ × १०० मीटर रिले संघातून सहभाग नोंदवत साताऱ्याची मान उंचावली आहे.


भव्य रॅली व सत्कार समारंभ:
“खेळाडूंच्या यशातच महाराष्ट्राचा मान, खेळूया जिंकूया…” या ब्रीदवाक्यासह या सुवर्णकन्या आणि सुवर्णवीरांचे सातारा शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित भव्य रॅलीच्या माध्यमातून या खेळाडूंचा आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या क्रीडारत्नांनी दाखवलेल्या अफाट कौशल्यामुळे भारत देश, महाराष्ट्र राज्य आणि सातारा जिल्ह्याचा गौरव जगभरात वाढला आहे. या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे सातारा जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून कौतुक होत असून, आगामी सर्व स्पर्धांसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!