जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या पैलवान समर्थ मदनेचा डंका; ८० किलो ग्रीको रोमन गटामध्ये पटकावले सुवर्णपदक

Screenshot

फलटण टुडे वृत्तसेवा ( शेंद्रे/सातारा दि ५ ऑक्टोबर २०२६):-
‘खेळ हीच खरी जिंकण्याची जिद्द’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचा मल्ल पैलवान समर्थ नितीन मदने याने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत दणदणीत यश संपादन केले आहे. शेंद्रे (जि. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना परिसरातील कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या स्पर्धेत समर्थने १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन ८० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावून अव्वल स्थान मिळवले.

या अभूतपूर्व विजयामुळे समर्थ मदने याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अजिंक्यतारा शिक्षण संस्था आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील अनेक मातब्बर मल्लांनी सहभाग घेतला होता. मात्र, समर्थने आपल्या उत्कृष्ट पकड आणि डावांच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.याला क्रीडा शिक्षक पै तुषार मोहिते यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कुस्तीच्या आखाड्यात मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि विभागीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, सौ. पूजा पाटील, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि सर्व क्रीडाप्रेमींनी पैलवान समर्थ मदने याचे हार्दिक अभिनंदन केले असून पुढील कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!