मुधोजी महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाला सलग सहाव्यांदा शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय विजेतेपद

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ११ ऑक्टोबर २०२६):-
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आयोजित सातारा विभागीय महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाने सलग सहाव्यांदा अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेचे आयोजन गुरुवारी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर, वर्ये (सातारा) येथे करण्यात आले होते.


स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाच्या महिला संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. पहिल्या फेरीत मुधोजीच्या संघाने यजमान कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर संघाचा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्यानंतर पार पडलेल्या उपांत्य सामन्यात सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड या संघावर सरळ सेटमध्ये मात करत अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात मुधोजी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराड या संघाला पराभूत केले आणि सातारा विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद सलग सहाव्यांदा आपल्या नावावर कोरले.


या विजेत्या संघात खेळाडू संजीवनी जाधव, नूतन महाडिक, सुप्रिया निंबाळकर, ऋतिका चतुरे, आयशा जाधव, सानिया जाधव, प्रणाली मुळीक, पूर्वा खानविलकर, समीक्षा साबळे, अनुष्का पवार व तेजस्वी शिंदे यांचा समावेश होता. या संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रो. डॉ. स्वप्नील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


मुधोजी महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील आंतरविभागीय व विद्यापीठस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!