
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ८ ऑक्टोबर २०२६):-
राज्यासमोर निर्माण झालेली सद्यःस्थिती, दुष्काळाचे सावट आणि पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने लक्षात घेऊन यंदाचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा न करता तो सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा उत्सव अथवा अनावश्यक खर्च न करता ६१ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या शुभेच्छांचे रूपांतर निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमात करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणी, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांसमोरील आव्हाने लक्षात घेता वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या जल्लोषाऐवजी निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या ६१ हजार वृक्षलागवड संकल्पाचा पहिला टप्पा म्हणून मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे ५ हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षलागवडीचा संदेश घराघरात पोहोचावा आणि प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

केवळ झाडे लावणे नव्हे, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करणे हीदेखील काळाची गरज आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन आवश्यक आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च आणि उत्सव यांना पर्याय म्हणून सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबवून ‘वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
६१ हजार वृक्षलागवडीचा हा संकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा निर्धार असून, या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या वृक्षारोपण वाटपाच्या वेळी वाढदिवस मूर्ती श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर माजी आमदार श्री दीपक चव्हाण सर जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई कांबळे तसेच प्रशालेचे प्राचार्य बाळकृष्ण काळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब खरात पंचायत समितीच्या सौ निलिमा गायकवाड मॅडम उपसभापती अमोल सस्ते, संचालक महादेव माने,श्री.भाऊसाहेब कापसे, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर हे उपस्थित होते

