
एमआयडीसी अग्निशामक व उद्योजक यांच्या वतीने आयोजित स्पर्धा प्रसंगी मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १६ एप्रिल २०२६):-
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन व एमआयडीसी अग्निशमन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक आणि सार्वजनिक इमारती अग्निशमन कवायती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत बारामती एमआयडीसी सह कुरकुंभ, जेजुरी, लोणी देवकर, फलटण औद्योगिक क्षेत्रातील बावीस कंपन्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडली. कार्यक्रमाचे आयोजन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व एमआयडीसीचे अग्निशमन केंद्र प्रमुख सुनील इंगवले यांनी केले.

यावेळी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेठकर, भारत फोर्जचे संजय अग्रवाल, सदाशिव पाटील, जीटीएन इंजीनियरिंगचे उद्धव मिश्रा, श्रायबर डायनॅमिक्सचे हेमंत चव्हाण, पियाजिओचे किरण चौधरी, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, कार्यकारणी सदस्य संभाजी माने, महादेव गायकवाड, हरीश कुंभारकर, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे , दिलीप भापकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्रे व स्मृतीचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी अनेक उद्योजक, अग्निशमन कर्मचारी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस एस फोर्ट स्टिकीन या जहाजावर स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हुतात्मा प्राप्त झाले तसेच त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील शूर अधिकारी, कर्मचारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ तसेच जनतेमध्ये अग्निशमन बाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी एकूण २२ लहान मोठ्या कंपन्यांच्या २०० अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या अग्निशमन स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्पर्धेपूर्वी जवळपास ३० कंपन्यांमधील २३० अधिकारी व कर्मचारी यांना एमआयडीसी अग्निशमन केंद्रामध्ये पाच दिवस प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमात प्रास्ताविक सुनील इंगवले व धनंजय जामदार यांनी केले. प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर, संजय अग्रवाल, उद्धव मिश्रा, सदाशिव पाटील, हेमंत चव्हाण, किरण चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी माने यांनी आभार व्यक्त केले.


