महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धा

किशोर गटात ॐ साईश्वर तर किशोरी गटात श्री समर्थ (अ) अजिंक्य
धडाकेबाज अंतिम लढतीत विजेत्यांचा जल्लोष!
श्रातिक गामी आणि खुशी यादव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरले

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई दि ५ मे २०२६): माटुंग्यातील ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर रंगलेल्या महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत अक्षरशः थरार, टाळ्यांचा कडकडाट आणि विजेतेपदासाठी प्राणपणाची झुंज पाहायला मिळाली. अखेर किशोर गटात ॐ साईश्वर सेवा मंडळ, तर किशोरी गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर (अ) यांनी दमदार कामगिरी करत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. बक्षीस वितरण समारंभ उन्मेश नरवणे (अध्यक्ष – ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर), प्रकाश नकाशे (सेक्रेटरी – महाराष्ट्र ॲम. स्पोर्ट्स असोसिएशनचे), ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब तोरसकर, सुधाकर राऊळ, सुरेंद्र विश्वकर्मा, नितीन पाष्टे, विकास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनीही अंतिम फेरीला उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

किशोर अंतिम फेरी : ॐ साईश्वरचा संयमी डाव, अजिंक्यपदावर मोहोर!

किशोरांच्या अंतिम फेरीत ॐ साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरवर ४-३ असा ४.१० मि. राखून १ गुणाने रोमांचक विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. नाणेफेक जिंकून ॐ साईश्वरने संरक्षण स्वीकारले आणि कर्णधाराचा हा निर्णय अचूक ठरला. विजेत्या संघाकडून श्रातिक गामी (४, ६.१० मि. संरक्षण व २ गुण), आरव साटम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), अधिराज गुरव (नाबाद १.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी अप्रतिम खेळ करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. पराभूत ॐ समर्थ भारतकडून निहाल शिंदे (नाबाद ५.३० मि. संरक्षण व १ गुण), साई निकम (१.५० मि. संरक्षण), ईशान देसाई (१.३० मि. संरक्षण), गौरव जोशी (१ गुण) यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सामन्यात कांती सर्वैया यांनी पंचप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.

किशोरी अंतिम फेरी : श्री समर्थचा एकतर्फी धडाका!

किशोरींच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर (अ)ने आर्य सेनावर १४-४ असा एकतर्फी विजय मिळवत अजिंक्यपदावर कब्जा केला. नाणेफेक जिंकून आर्य सेनाने संरक्षण स्वीकारले, मात्र त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. विजयी संघाकडून खुशी यादव (४.३० मि. संरक्षण व ५ गुण), ग्रंथा वारघडे (४.५० मि. संरक्षण व १ गुण), मनवा सावंत (२.१० मि. संरक्षण व १ गुण), आराध्य माळी (२ मि. संरक्षण) आणि आस्था महाडिक (४ गुण) यांनी शानदार खेळाची आतषबाजी केली. पराभूत आर्य सेनाकडून गार्गी शिंदे, दक्षता घोलप, सौम्या मोरे, गार्गी मोरे, रिया गोलवस्कर यांना विशेष कामगिरी नोंदवता आली नाही.

तृतीय क्रमांकासाठीही चुरस, सरस्वती आणि शिवनेरीचा विजय!

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात किशोर गटात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्रावर ४-२ असा विजय मिळवला. तर किशोरी गटात शिवनेरी सेवा मंडळाने ॐ साईश्वर सेवा मंडळाचा २-१ असा पराभव करून तृतीय स्थान पटकावले.

स्पर्धेतील मानकरी : सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा गौरव!

                                  किशोर                                     किशोरी  

अष्टपैलू खेळाडू :- श्रातिक गामी (ॐ साईश्वर) खुशी यादव (श्री समर्थ)

उत्कृष्ट संरक्षक :- निहाल शिंदे (ॐ समर्थ) ग्रंथा वारघडे (श्री समर्थ)

उत्कृष्ट आक्रमक :- अधिराज गुरव (ॐ साईश्वर) दक्षता घोलप (आर्य सेना)

महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन व ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरची स्पर्धा यशस्वी करणारी टिम

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!