प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे 15 जुलैपासून ‘जन्मशताब्दी वर्ष’, फलटणमध्ये 29 जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २९ जून २०२६):-

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या अलौकिक वक्तृत्वशैलीमुळे भारतातच नव्हे तर परदेशातही फलटणचे नाव मोठ्या अभिमानाने प्रसिद्धीस आले आहे. सलग पाच दशके आपल्या ओघवत्या, मंत्रमुग्ध करणार्‍या आणि ओजस्वी वक्तृत्वाने अनेक पिढ्यांना वैचारिक मार्गदर्शन करून एक सृजनशील समाजमन घडविण्यासाठी प्राचार्यांनी आयुष्यभर प्रबोधन केले. फलटण हीच प्राचार्यांची मुख्य कर्मभूमी राहिली आहे. या महान विचारवंताचे जन्मशताब्दी वर्ष यंदा दिनांक 15 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. या सुवर्णसंधीचे औचित्य साधून प्राचार्यांच्या अलौकिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांत वर्षभर प्रबोधनपर व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा आणि त्यामागची भूमिका निश्‍चित करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्राचार्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येत्या सोमवार, दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता ‘महाराजा आयकॉन’, डी.एड. चौक, लक्ष्मीनगर, फलटण येथे ही विशेष बैठक पार पडणार आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याशी तालुक्यातील व राज्यातील अनेकांचा अत्यंत निकटचा आणि कौटुंबिक स्नेह होता. त्यामुळे या जन्मशताब्दी महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्यासाठी सर्व फलटणकर नागरिक, अभ्यासक आणि चाहत्यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व मौल्यवान सूचना मांडाव्यात, असे आवाहन बैठकीचे निमंत्रक दिलीपसिंह भोसले, डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके, रवींद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!