फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २२ सप्टेंबर २०२६):-
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल, सावळच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे.
या शासकीय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या श्रेया रणजीत गोरे आणि वेदिका विजय बारे या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट स्केटिंग कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे दोन्ही विद्यार्थिनींची विभागस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेदरम्यान दोन्ही खेळाडूंनी वेग, संतुलन, चपळता, तंत्रशुद्ध स्केटिंग तसेच आत्मविश्वासपूर्ण खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळविले.
ज्ञानसागर गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. शाळेतील विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना नियमित सराव, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. याच क्रीडाभिमुख वातावरणातून श्रेया गोरे व वेदिका बारे यांनी मिळविलेले हे यश शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर मानसिंग आटोळे सर यांनी व्यक्त केले.

दोन्ही विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष डॉ सागर आटोळे सर, मुख्याध्यापक, क्रीडा विभाग, प्रशिक्षक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील या यशामुळे ज्ञानसागर गुरुकुलच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विभागस्तरीय स्पर्धेतही दोन्ही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


