फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २४ सप्टेंबर २०२६):-
फलटण शहरामध्ये १४ सप्टेंबरपासून श्री गणेशोत्सव सोहळा अत्यंत पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा होत आहे. शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी असलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील लहान-मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, त्यादृष्टीने फलटण नगरपरिषदेच्या वतीने व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नगरपरिषदेने घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सांस्कृतिक भवन आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तसेच, गणेशमूर्ती दान करू इच्छिणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पिरॅमिड चौक, डी.एड. कॉलेज चौक, गजानन चौक आणि उंब्रेश्वर चौक या चार प्रमुख ठिकाणी मूर्ती संकलन वाहने तैनात करण्यात येणार आहेत. शहरात सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पंढरपूर पूल, बारामती पूल आणि शेती शाळा परिसर या ठिकाणी क्रेनची यंत्रणा उभारण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर पुरेशी विद्युत व्यवस्था, सुरक्षेसाठी लाईफ गार्ड्स, स्वच्छता आणि आणीबाणीच्या प्रसंगासाठी अग्निशमन वाहने व रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती नगरपरिषदेच्या क्रेनमध्ये ठेवून विसर्जन प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


