जिल्हा बँक निवडणुकीसाठी रामराजेंकडून उमेदवारी अर्ज दाखल; सहकार आणि राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

भाजप-अजित पवार गटाच्या बैठकीची कल्पना नव्हती; निमंत्रण आल्यावर बँकेच्या हिताची भूमिका मांडेन: आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि २८ सप्टेंबर २०२६):-
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आमदार तथा महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था व सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे.


सातारा जिल्हा बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी २१ संचालक पदांची निवडणूक होत आहे. सुट्ट्यांनंतर सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) पुन्हा अर्ज स्वीकृती सुरू होताच रामराजेंनी आपला अर्ज दाखल केला. यापूर्वीच फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून माजी आमदार दीपक चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध नेत्यांनी अर्ज भरल्याने राजकीय वातावरण तापले आहे.


पत्रकारांच्या प्रश्नावर रामराजेंचे स्पष्टीकरण:
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामराजे नाईक-निंबाळकर यांना काल पार पडलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्यांच्या बैठकीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना, “मला त्या बैठकीची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती; मात्र जर त्या बैठकीचे निमंत्रण आले, तर मी नक्कीच जिल्हा बँकेच्या हिताची भूमिका तिथे मांडेन,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात भाजप व राष्ट्रवादीमधील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान आणि ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, आगामी काही दिवसांत उर्वरित अर्ज दाखल झाल्यानंतर लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!