पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; तातडीने ई-केवायसी करण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 30 जुलै ३०२६):-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 1 हजार 206 गावांमधील 31 हजार 556 शेतकरी पात्र ठरले असून, संबंधित गावांमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली आहे.
शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केल्यानंतर त्याची सखोल पडताळणी करून ही पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडील 41 हजार 421 शेतकऱ्यांची तर राष्ट्रीयकृत व कमर्शियल बँकांकडील 11 हजार 201 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. कर्जमुक्तीचा लाभ थेट खात्यात जमा होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी या केंद्रांवर जाऊन आधार प्रमाणीकरण करून आपल्या कर्ज खात्याची पडताळणी करू शकतात. आतापर्यंत सुमारे 63 टक्के पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित 37 टक्के शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून लाभाची रक्कम खात्यात जमा करता येईल. तसेच ई-केवायसी करताना आधार किंवा कर्ज खात्याच्या माहितीत तफावत आढळल्यास, सेवा केंद्रावरूनच ऑनलाइन तक्रार दाखल करता येईल. या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. योजनेच्या लाभासाठी ॲग्री-स्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही, त्यांनी ई-केवायसी करत्यावेळीच ही नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री. सुद्रीक यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!