जिल्ह्यातील पत्रकारांनी वस्तूनिष्ठ पत्रकारितेची परंपरा बळकट करावी : हरिश पाटणेग्रामीण पत्रकारांना अधी स्वीकृत्ती देण्याचे भाग्य लाभले

फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना शासकीय अधिस्विकृती पत्रिका प्रदान

फलटण टुडे वृत्तसेवा सातारा, दि.१७ जून २०२६):- : ‘‘ पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नांना वाचा फोडत लोकहित जपावे, सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करावी, अशा शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिश पाटणे यांनी दिल्या. माझ्या कारकिर्दीत जास्तीत जास्त ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळत आहे हे आपले भाग्य आहे, संघटनेचा अध्यक्ष म्हणून जे बोललो ते करत असल्याचे समाधान मोठे असल्याचे उदगारही पाटणे यांनी काढले.
साप्ताहिक फलटण नायकचे संपादक तथा पत्रकार मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी प्रतिष्ठेची पत्रकार अधिस्वीकृती पत्रिका (अ‍ॅक्रीडेशन कार्ड) हरिश पाटणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त ते बोलत होते.

सातारा जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव,गोरख तावरे सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचे राहुल पवार, फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, पत्रकार रोहित वाकडे, शेखर जगताप, अरुण जायकर यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सातारा जिल्ह्यातील अशोक इथापे (देगाव) वाई व अरुण जायकर (वाघोली) कोरेगाव यांनाही अधिस्वीकृती पत्रिका प्रदान करण्यात आली.

हरिश पाटणे म्हणाले, ‘‘आमच्या कार्यकाळात महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीमार्फत सातारा जिल्ह्यातील अनेक पात्र पत्रकार व संपादकांना अधिस्वीकृती पत्रिका प्रदान करण्यात आली आहे. हे पत्रिका (कार्ड) केवळ ओळखपत्र नसून पत्रकाराच्या विश्वासार्हता,जबाबदारी आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.’’
संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी माझ्या कारकिर्दीत जास्तीत जास्त ग्रामीण पत्रकारांना अधी स्वीकृती पत्रिका कशी मिळेल याला प्राधान्य देईल असे म्हटले होते. विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करणाऱ्या पत्रकार मित्रांना ॲक्रेडेशन कार्ड देताना मनस्वी समाधान लाभत आहे. या प्रक्रियेत विभागीय समितीच्या सर्व सहकाऱ्यांचे व राज्य आधी स्वीकृती समितीचेही चांगले सहकार्य मिळत असल्याने सातारा जिल्ह्यातील सहकारी बांधवांना न्याय देता येत आहे असेही पाटणे म्हणाले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून फलटणच्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे मितेश उर्फ काकासाहेब खराडे हे आपल्या साप्ताहिक फलटण नायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, राजकीय तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम सातत्यपूर्वक करीत आहेत. ग्रामीण भागातील समस्या, जनतेच्या अडचणी आणि विकासात्मक विषय प्रभावीपणे मांडत त्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आल्याने फलटण तालुक्यासह पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या सन्मानामुळे फलटण नायक परिवारासह वाचकवर्गामध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अधिक जबाबदारीने आणि सामाजिक भान जपत पत्रकारितेचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार काकासाहेब खराडे यांनी व्यक्त केला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!