सफाई कर्मचारी हे स्वच्छतादूत; विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करा

लाड पागे समितीच्या शिफारशी ३१ ऑगस्टपर्यंत लागू करण्याचे निर्देश

  • सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे निर्देश

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. ११ ऑगस्ट २०२६): – जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रभावी कार्यवाही करावी. लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून पात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या तातडीने द्याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी ३१ ऑगस्टपर्यंत लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव, विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी तसेच सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. या कार्डच्या माध्यमातून त्यांना उपचाराच्या वेळी कॅशलेस उपचाराचा लाभ मिळेल, याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी. सफाई कर्मचारी हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना अनेकदा धोकादायक परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे त्यांना पुरेसे विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. ऑन ड्युटी मृत्यू झाल्यास सव्वा कोटी रुपयांपर्यंत, तर कर्तव्यावर असताना जखमी झाल्यास किमान पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या बँक खात्यात जमा होते, त्या संबंधित बँकांशी करार करून विमा संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांना आवास योजनेतून ५०० चौरस फुटांचे घर देण्यात येत आहे. घरकुलाचा लाभ हा केवळ निवारा उपलब्ध करून देणारा नसून सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन देणारा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या योजनेतील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

सफाई कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त होताना शासन नियमानुसार मिळणारे निवृत्तीवेतन व इतर सर्व लाभ वेळेत मिळतील, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कोणताही कर्मचारी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत. पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत विविध विभागांनी समन्वयाने काम करावे. त्यांच्या सेवा, आरोग्य, निवास, विमा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित योजनांचा लाभ त्यांना प्रत्यक्ष मिळतो आहे की नाही, याचा नियमित आढावा घ्यावा, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

सफाई कर्मचाऱ्यांचे काम समाजाच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी थेट जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे, असे आवाहन अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!