आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांची शिवार फेरी; नाना ऊस शेती तंत्रज्ञानाचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १२ ऑगस्ट २०२६)- ऊस पिकाचे वाढते उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शिवारात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने ‘ऊस शेती शेतकरी शिवार फेरी व क्षेत्र भेट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मौजे भवानीनगर, राजुरी येथील श्री. धनंजय पवार, चेअरमन, फलटण सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या ऊस शेतावर या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाना ऊस शेती तंत्रज्ञानाचे निर्माते ऊस शेतीतज्ज्ञ श्री. नवनाथ गायकवाड यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शिवारात सविस्तर मार्गदर्शन केले.
 ऊस शेती क्षेत्र भेटीदरम्यान लागवडीपासून ते पिकाच्या विविध अवस्थांतील व्यवस्थापनापर्यंतच्या महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. ऊस पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनक्षमता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे तसेच उपलब्ध संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ऊस शेताची पाहणी करून विविध तांत्रिक बाबी समजून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ऊस शेतीतील अडचणी व उत्पादनवाढीशी संबंधित प्रश्न तज्ज्ञांसमोर मांडले. श्री. नवनाथ गायकवाड यांनी नाना ऊस शेती तंत्रज्ञानाद्वारे दोन पट्ट्यातील १२ फूट अंतरावर ऊस लागवडीची शिफारस, एकरी १३० टन ऊस उत्पादनाची हमी, अधिकतम ऊस फुटवे, ऊस पाचट व्यवस्थापन तसेच मुख्य उद्देश “कमी खर्चात, कमी पाण्यात, अधिक व दर्जेदार ऊस उत्पादन” हा आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष शिवारातील उदाहरणांसह उत्तरे देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. प्रमोद काकडे, प्रगतिशील ऊस बागायतदार, निंबूत, श्री. आप्पासाहेब खलाटे, प्रगतिशील ऊस बागायतदार, खुंटे, श्री. महानंद माने, संचालक सदस्य, श्रीराम सहकारी साखर कारखाना; श्री. अरविंद निकम, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, श्री. रामदास कदम, सदस्य, महाविद्यालयीन समिती तसेच डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण आणि डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, फलटण यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवार फेरीमुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. शेतामध्येच तज्ज्ञांकडून माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन झाले.
 कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तार कार्य यांची सांगड घालत शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने अशा क्षेत्रभेटी, शिवार फेऱ्या आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन, प्रत्यक्ष पिकाच्या माध्यमातून तंत्रज्ञान समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, आधुनिक ऊस शेतीच्या दिशेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!