फलटण शहर वाहतूक शाखा व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा संयुक्त उपक्रम
युवकांमध्ये वाढत चाललेले व्यसनाधीनतेचे प्रमाण, वाढते रस्ते अपघात तसेच सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने फलटण शहर रस्ते वाहतूक शाखा आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान, रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षा’ या विषयांवर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत जगदाळे तसेच गोपनीय शाखेचे श्री. महेश जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
नशामुक्त भारतासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. विश्वजीत जगदाळे यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तंबाखू, गुटखा, दारू तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ‘व्यसनाला नाही, उज्ज्वल भवितव्याला होकार’ देत युवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजामध्येही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन हीच खरी सुरक्षितता, रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वेगमर्यादेचे पालन करणे, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच वाहतूक सिग्नलचे पालन करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘वाहतूक नियम पाळा, स्वतःचा व इतरांचा जीव वाचवा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. अपघात घडल्यानंतरच्या परिणामांपेक्षा अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेली काळजी अधिक महत्त्वाची असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन, सायबर सुरक्षेबाबत श्री. महेश जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. OTP, PIN, पासवर्ड, CVV, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, तसेच संशयास्पद लिंक, बनावट कॉल, मेसेज, सोशल मीडिया अकाउंट आणि ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया वापरताना गोपनीयता, सुरक्षा, योग्य वापर करावा आणि कोणतीही संशयास्पद ऑनलाइन घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण तसेच डॉ. यु. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, फलटण यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन आवश्यक असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सानिका फडतरे व कुमारी मृणाल गिरमे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. पी. बनकर, सहाय्यक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नशामुक्ती, रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सुरक्षित वाहतूक आणि डिजिटल सजगतेची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.


