सीसीटीव्ही नसलेली केंद्रे होणार बंद, केंद्र संख्या मर्यादित करणार!

कोल्हापूर विभागीय मंडळाकडून ५३९ केंद्रांचे फेरपरीक्षण सुरू!

फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर, दि १० ऑगस्ट २०२६):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि पूर्णतः गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा केंद्रांची अवाजवी संख्या नियंत्रित करणे आणि केंद्रांवर सर्व तांत्रिक व भौतिक सुविधांची शंभर टक्के उपलब्धता निश्चित करण्यासाठी विभागीय मंडळाने सातारा, सांगली व कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांच्या सखोल तपासणीचे व पुनर्रचनेचे काम आतापासूनच सुरू केले आहे.

या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत कार्यान्वित CCTV (सीसीटीव्ही) कॅमेरे बसवलेले नसतील, ती केंद्रे कोणतीही गय न करता थेट बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यार्थी संख्येचे निकष पूर्ण न करणारी, भौतिक सुविधांचा अभाव असणारी केंद्रे रद्द करून तिथल्या विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त केंद्रांमध्ये समायोजित करण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. समायोजन करताना केंद्रापासूनचे अंतर आणि दळणवळणाच्या सुविधा विचारात घेतल्या जाणार आहेत.

मंडळाकडून १७४ संवेदनशील केंद्रांची झाडाझडती; उर्वरित केंद्रांवर शिक्षणाधिकाऱ्यांची नजर..

सध्या कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अखत्यारीत इयत्ता १०वीची ३६२ आणि इयत्ता १२वीची १७७ अशी एकूण ५३९ परीक्षा केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी सुमारे एक-तृतीयांश म्हणजेच १७४ संवेदनशील, अपुऱ्या सुविधा असणाऱ्या आणि त्रुटी आढळलेल्या केंद्रांना विभागीय मंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि क्षेत्रीय पथके प्रत्यक्ष भेटी देऊन बारीक पाहणी करत आहेत. यापूर्वी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्र भेटीचे अहवाल पाठवले होते. तथापि मंडळाने आता थेट निवडक केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विभागीय पथकांद्वारे प्रत्यक्ष भेटी दिल्या जाणाऱ्या १७४ परीक्षा केंद्रांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १० वीची ५० आणि १२वीची ३५ (एकूण ८५) केंद्रे, सातारा जिल्ह्यातील१० वीची २९ आणि १२वीची २५ (एकूण ५४) केंद्रे, तसेच सांगली जिल्ह्यातील १०वीची १६ आणि १२वीची २० (एकूण ३६) केंद्रे अशा एकूण ९५ (१०वी) आणि ७९ (१२वी) केंद्रांचा समावेश आहे. या १७४ केंद्रांव्यतिरिक्त उर्वरित सर्व परीक्षा केंद्रांची तपासणी संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी (BEO) यांना स्वतः प्रत्यक्ष भेट करणार आहेत..

२० ऑगस्टची डेडलाईन;

परीक्षेचे नियोजन वेळेत पूर्ण करण्यासाठी मंडळाने या संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी २० ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत आखून दिली आहे. या कालावधीत सर्व केंद्रांची काटेकोर तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल विभागीय मंडळाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण मोहिमेबाबत भूमिका स्पष्ट करताना कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले,
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि परीक्षांमधील पारदर्शकता याच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही आणि भौतिक सुविधांचा अभाव आहे, तिथे परीक्षा घेणे अशक्य आहे. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्यावा. त्रुटी असतानाही केवळ सोय म्हणून एखादे केंद्र सुरू ठेवण्याची शिफारस केली आणि पुढे तिथे गैरप्रकार किंवा विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, तर शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यालाही थेट जबाबदार धरून त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

कडक बैठक निकष आणि तपासणीची ‘चेकलिस्ट,

सुधारित निकषानुसार परीक्षा केंद्र सुरू ठेवण्यासाठी पटसंख्येचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत:
इयत्ता १०वी: शहरी भागातील केंद्रावर किमान ४०० आणि ग्रामीण भागात किमान ३०० विद्यार्थी संख्या आवश्यक आहे. प्रचलित निकष कमी पटसंखेचे असल्याने केंद्रांची संख्या वाढलेली आहे.

इयत्ता १२वी: शहरी भागासाठी किमान ५०० आणि ग्रामीण भागासाठी किमान ४०० विद्यार्थ्यांची क्षमता असणे अनिवार्य आहे.

वर्गखोली क्षमता: प्रत्येक वर्गखोलीत २५ ड्युअल डेस्कवर २५ विद्यार्थी बसण्याची क्षमता असणे बंधनकारक आहे.

प्रत्यक्ष तपासणीदरम्यान अधिकारी खालील प्रमुख सुविधांची पडताळणी करत आहेत:

  • सुरक्षा व गोपनीयता: उत्तरपत्रिका व गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र २ सुरक्षित दालने, इमारतीभोवती पक्की संरक्षित भिंत (कंपाऊंड वॉल) आणि वर्गखोल्यांच्या खिडक्यांना जाळ्या.
  • तांत्रिक सुविधा:सर्व वर्गखोल्या व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, प्रिंटर, हाय-स्पीड इंटरनेट, पंखे, वीज आणि वीज गेल्यास जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय.
  • मूलभूत सोयी: मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच केंद्रापासून पोलीस ठाणे, वैद्यकीय सेवा व एसटी/रेल्वे बस थांब्याचे अंतर.

मंडळाच्या या धडक कारवाईमुळे निकष पाळणाऱ्या व दर्जेदार सुविधा असलेल्या शाळांनाच परीक्षा केंद्राचा दर्जा मिळणार असून, आगामी १०वी-१२वीच्या परीक्षा अत्यंत मोकळ्या, आणखीनच शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडणार आहेत.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!